मुंबई : नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाची १५० वर्षांची इमारत ऐतिहासिक वारसा म्हणून जपताना मुद्रणालयाकरिता नवी इमारत बांधण्यात येईल, अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. जुनी मुद्रणालयाची इमारत वारसा म्हणून जपण्याची मागणी शेकापच्या जयंत पाटील यांनी केली होती.नागो गाणार, अनिल सोले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर राज्यमंत्री पोटे-पाटील म्हणाले की, शासकीय मुद्रणालयाची नवीन इमारत तयार करून तेथे आधुनिकीकरण करावे, अशी मुद्रणतज्ज्ञांच्या समितीची शिफारस आहे. नवीन इमारतीकरिता १३ कोटी ९८ लाख ६३ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. दरम्यान, बीओटी तत्त्वावर मुद्रणालयाची इमारत बांधण्याचा निर्णय झाला. मात्र बीओटीवर प्रकल्प सुसाध्य ठरत नसल्याने इमारतीचे २५ कोटी २१ लाख ९५ हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक मान्यतेकरिता सादर केले. मूळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन बराच काळ लोटला असल्यामुळे व सदर अंदाजपत्रकातील कामावर कोणताही खर्च न झाल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता देता येत नसल्याचा अभिप्राय वित्त विभागाने दिलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानुसार ४६ कोटी ५१ लाख ३० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली गेली. शासकीय मुद्रणालयाकरिता ४६ नवीन यंत्रसामग्री खरेदी केली असून, १७५ पदे भरण्यात येणार आहेत.