- जमीर काझीमुंबई : रखडलेल्या पोलीस भरतीला आता ‘मुहूर्त’ मिळाला असला तरी शिवसेनेने त्याबाबत निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे.कॉन्स्टेबल पदासाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेऊन त्यातील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी देता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जाहीरनाम्यात ही पद्धत रद्द करून मैदानी चाचणी प्रथम व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचे नमूद केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही २०१९च्या पोलीस भरतीत लेखी परीक्षा पहिल्यांदा घेण्याचे निश्चित केले आहे.२०१९ मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेल्या ५,२९७ पदासाठीची भरती पहिल्यांदा घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ११ लाख ९७ हजार अर्ज आले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने पूर्वीची पद्धत रद्द करून पहिल्यांदा लेखी व त्यानंतर मैदानी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामीण भागातील तरुणांकडून विरोध होता. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने २०१९विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात हा मुद्दा नमूद केला होता. महाविकास आघाडी सरकारने भरतीप्रक्रियेसाठी राबविले जाणारी महापोर्टल रद्द केले. त्यामुळे कॉन्स्टेबलच्या भरती पद्धतीमध्ये बदल केला जाईल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही.
पुढच्या पोलीस भरतीमध्ये बदलपोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र २०१९मध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्याचे नमूद असून, रद्द करावयाचे झाल्यास नव्याने जाहिरात देऊन पुन्हा सर्व प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे विलंब होणार असल्याने तो टाळण्यासाठी ही भरती जाहिरातीप्रमाणे घेण्यात येईल. त्यानंतर पुढील भरतीसाठी नियमावलीत बदल करून पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.- दिलीप वळसे-पाटील (गृहमंत्री)