एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षांना जुलैमध्ये प्राधान्यक्रम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:48+5:302021-06-09T04:07:48+5:30
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच ...
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएसी परीक्षांची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडण्ट राईट्स संघटनेकडून करण्यात आली आहे.
एमपीएससी परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप असताना उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने शासनाने परीक्षांबाबत निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत संघटनेचे सदस्य महेश बडे यांनी व्यक्त केले. परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोगाकडूनही तयारी करण्यात आल्याची माहिती समजल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने वेळ वाया जात आहेच; शिवाय उमेदवारांचे वय वाढत असून, ते परीक्षांना अपात्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. याचसोबत मानसिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ताण, सामाजिक जबाबदाऱ्या अशा विविध कारणांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
२०१९ मध्ये मागील संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडली होती. त्यामुळे उमेदवार कोणत्या मानसिकतेमध्ये असतील आणि त्यांचे कसे खच्चीकरण होत असेल, याचा विचार करून शासनाने जुलै महिन्यात या परीक्षांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यात हजारो शासकीय पदे रिक्त
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षकासारखी पदाची निवड एमपीएससीद्वारे भरण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, परीक्षांतील पदांच्या निवड प्रक्रिया ही एमपीएससीद्वारे करण्यात यावी, यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडण्ट राईट्स संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. सद्यस्थितीत राज्यात हजारो शासकीय पदे रिक्त असून, एमपीएससी परीक्षांची तयारी लाखो उमेदवार करत आहेत. त्यामुळे या पदांसाठी एमपीएससीमधून निवड प्रक्रिया पार पडल्यास उमेदवारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया महेश बडे यांनी दिली आहे.