पर्यावरणपूरक, जबाबदार पर्यटनाला प्राधान्य; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची माहिती
By स्नेहा मोरे | Published: January 24, 2024 06:54 PM2024-01-24T18:54:17+5:302024-01-24T18:54:41+5:30
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात अनेक बदल होणे अपेक्षित आहे.
मुंबई: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात अनेक बदल होणे अपेक्षित आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था आहे, अशा देशांकडून शिकले पाहिजे. येत्या काळात पर्यावरणपूरक पर्यटन आणि जबाबदार पर्यटनाला प्राधान्य देणारे उपक्रम राबवण्यासाठी शासन प्राधान्य देणार आहे. पर्यटनासाठी जीवनशैली आणि जीवनासाठी पर्यटन हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार अमलात आणला पाहिजे, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीतर्फे २० ते २८ जानेवारीदरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये बुधवारी वांद्रे येथील बीकेसी हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी राज्याच्या पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, विझ क्राफ्टचे संस्थापक सबा जोसेफ, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी, पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी पर्यटन व्यावसायिकांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून पर्यटकांना विविध सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही पर्यटनमंत्री महाजन यांनी दिली. या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आई महिला केंद्रित पर्यटन धोरणदेखील आणले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन धोरणे आणून त्यांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येईल, असे पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी सांगितले.
प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. पर्यटनाला जाऊ तिथे सोबत स्वतःची पाण्याची बॉटल नेणे ही छोटीशी सवयदेखील प्लास्टिकचा होत असलेला वापर टाळण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. पर्यटन करताना एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. कृतीतून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. -दिया मिर्झा, अभिनेत्री