Join us

घराणेशाहीला प्राधान्य

By admin | Published: April 11, 2015 1:31 AM

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. एकाच घरात दोन ते तीन जणांना उमेदवारी देत प्रामाणिक कार्यकर्त्यांवर

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. एकाच घरात दोन ते तीन जणांना उमेदवारी देत प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीवर टीका करणारी शिवसेनाही यात आघाडीवर असून आयात उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांना पसंती दिली आहे.सर्वच राजकीय पक्षांना कामांसाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असते. परंतु, जेव्हा उमेदवारीची वेळ येते तेव्हा मात्र प्रत्येक नातेवाइकांची वर्णी लावली जाते. शिवसेनेने नेहमीच राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर टीका केली. परंतु, यावेळी त्यांनीच मोठ्या प्रमाणात घराणेशाहीला स्थान दिले आहे. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले एम. के. मढवी, त्यांची पत्नी व मुलास तिकीट दिले आहे. घणसोलीमध्ये प्रशांत पाटील, त्यांची पत्नी व आईला उमेदवारी दिली आहे. कोपरखैरणेमध्ये शिवराम पाटील, त्यांची पत्नी व त्यांच्याबरोबर पक्षात आलेल्या दोन कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. कोपरीमध्ये विलास भोईर यांच्या घरात दोघांना तिकीट दिले आहे. नेरूळमध्ये नामदेव भगत व त्यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. शिवसेना ६८ जागा लढवत असून त्यामधील २० ठिकाणी बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले आहे. या व्यतिरिक्त विजय चौगुले व जगदीश गवते यांच्या घरात तीन जणांना व वाशीत विठ्ठल मोरे,सोमनाथ वास्कर यांना दोन जागा देण्यात आल्या आहेत. घराणेशाही व बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. आम्ही आयुष्यभर फक्त झेंडे मिरवून घोषणाच द्यायच्या का, असा जाब कार्यकर्ते विचारू लागले आहेत. नाईक परिवारातील कोणी निवडणुकीच्या रिंगणात नाही. परंतु, पक्षातील कार्यकर्त्यांना एकापेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारी दिली आहे. नवीन गवते, तुर्भेतील पाटील यांच्या घरात तीन जणांना उमेदवारी दिली आहे. रामअशिष यादव, संजय पाटील, अनंत सुतार, न्हानू तेली, अशोक गावडे, सुरेश कुलकर्णी यांना प्रत्येकी दोन ठिकाणी उमेदवारी दिली आहे. काँगे्रसमध्येही जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या घरातही तीन जणांना, शंकर माटे, अमित पाटील, संतोष शेट्टी यांच्या घरात दोन जणांना तिकिटे देण्यात आली आहेत. अपक्ष सुधाकर सोनावणे दोन ठिकाणी लढत आहेत. शेकापमध्येही कविता जाधव व भरत जाधव या दाम्पत्याला तिकीट देण्यात आले आहे.