Join us

म्हाडा अर्जदारांचे आॅनलाइन पेमेंटला प्राधान्य

By admin | Published: April 28, 2015 1:06 AM

म्हाडाचे घर मिळविण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत रोज सरासरी ३ ते ४ हजारांनी वाढ होत आहे. एका आठवड्याच्या आत ५३ हजारांवर अर्जदारांनी प्रवेश नोंदवला आहे.

मुंबई : म्हाडाचे घर मिळविण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत रोज सरासरी ३ ते ४ हजारांनी वाढ होत आहे. एका आठवड्याच्या आत ५३ हजारांवर अर्जदारांनी प्रवेश नोंदवला आहे. त्यापैकी ७ हजार ३०० जणांनी अनामत रक्कम भरून लॉटरीसाठी प्रवेश निश्चित केलेला आहे. विशेष म्हणजे आॅनलाइन पेमेंट करणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होत आहे. मुंबईतील ९९७ व अंध आणि अपंग प्रवर्गातील ६६ घरांसाठी ३१ मे रोजी लॉटरी काढली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या किमती वाढल्या असल्या तरी घरांचा तुटवडा असल्याने नागरिक हक्काच्या घरासाठी नशीब अजमावत आहेत. नावनोंदणी केलेल्या ५३ हजार ४३८पैकी ७,३०० जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे. त्यापैकी केवळ २,५५० जणांनी डीडी काढून अ‍ॅक्सिस बॅँकेच्या शाखेत डिपॉझिट भरली आहे. उर्वरित सर्वांनी आॅनलाइन पेंमेट केले आहे. वाढत्या उन्हात बॅँकेत जाऊन रांगा लावण्यापेक्षा आॅनलाइन पैसे भरण्याला लोक प्राधान्य देत आहेत. या लॉटरीत सहभागी होण्यासाठी नाव नोंदविण्याची मुदत ९ मे, तर आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १४ मे अशी आहे. अर्ज व डी. डी. भरण्यासाठी २० मेपर्यंत मुदत आहे. मुंबई बोर्डाकडून अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील एकूण ९९७ घरांचा समावेश आहे. त्याचबरोेबर अंध व अपंग प्रवर्गातील आरक्षित ६६ फ्लॅटची सोडत यावेळी काढली जाणार आहे. ३१ मे रोजी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना म्हाडा कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)