लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी कामगार विभागामार्फत तातडीने संकेतस्थळ कार्यान्वित करावे, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करणाऱ्या विविध विभागांच्या यंत्रणाचे अधिकाऱ्यांचा या क्षेत्रातील कार्यकर्ते व सामाजिक संघटनांशी नियमित समन्वय सुरू करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी दिल्या.
असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आज विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्रात पुन्हा कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असंघटित कामगार पुन्हा मूळ गावी परत जाण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने असंघटित कामगारांना आर्थिक मदत आणि अन्नछत्राच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. असंघटित कामगारांसाठी सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा देणे आवश्यक आहे आणि यासाठी राज्य शासन, सामाजिक संघटना या सर्वांनी एकत्रपणे काम करणे आवश्यक आहे. शिवाय, कामगार विभाग आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही गोऱ्हे यांनी केल्या.
कामगार मंत्री वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊननंतर मजुरांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र आता अशी परिस्थिती येणार नाही अशी काळजी घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक नोडल ऑफिसर नेमण्यात येईल जेणेकरून हे ऑफिसर सर्व यंत्रणेशी संपर्कात राहतील. तर, आरोग्य मंत्री टोपे यांनी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.