Join us

विद्यार्थ्याना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले; कैद्याशी संवाद अन् अभ्यासही

By मनीषा म्हात्रे | Published: March 04, 2023 11:56 AM

आपला संशोधन विषय निवडत असतात याकरीता त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील बंद्यांच्या माहितीची आवश्यकता भासत असते.     

मुंबई - सामाजिक जिवनात मानवांच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संशोधनाचा वापर केला जातो. सामाजिक संशोधन हा एक कठीण विषय आहे कारण कोणीही मानवी वर्तनाबद्दल अंदाज लावू शकत नाही. परंतू सामाजिक संशोधनामुळे मानवी व्यवहार आणि समाजाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टींचा उहापोह होवू शकतो. त्याकरिता विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील विद्यार्थी विशेषतः LAW ,MSW अभ्यासक्रमाच्या संबंधित शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेट द्यावी लागते. विविध विषयावर महाराष्ट्रातील तसेच देशातील विद्यापीठामार्फत संशोधन करण्यात येते. कारागृहातील बंद्यावरदेखील संशोधन करण्यासाठी विद्यार्थी हे आपला संशोधन विषय निवडत असतात याकरीता त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील बंद्यांच्या माहितीची आवश्यकता भासत असते.     

अमिताभ गुप्ता,अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक ,कारागृह व सुधारसेवा ,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हि बाब लक्षात घेवून नोंदणीकृत संस्था /शासन मान्य विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनाकरीता कारागृह भेटीची परवानगी देणेबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. काही अटींच्या अधिन राहून हि परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देखील देणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.      या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे तसेच बंद्यांच्या विविध सुधारणा व पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती त्यांना मिळणार आहे. समाजकार्य विषयांच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटींमुळे शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होणार आहे. विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या  अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या क्षेत्रभेटींमुळे ज्ञानवृद्धी होणार आहे. कारागृहातील बंद्यांना कायदेविषयक सहाय्य करण्यासाठी विधी व्यवसायाच्या वेळी या भेटीचा ते भविष्यात उपयोग करू शकतील. तसेच या संशोधनाद्वारे बंद्यांच्या समस्या ,मानसिक स्थितीचा अभ्यास आदींबाबत अभ्यास करता येणार आहे. यामुळे देखील संशोधकांना एका नवीन विषयाचे ज्ञान प्राप्त होणार आहे . टाटा सामाजिक विज्ञान संस्था व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे देखील बंद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत. महाराष्ट्रातील बंद्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर, विशेषतः भावनिक आणि मानसिक आरोग्याबाबत तपशीलवार संशोधन महाराष्ट्र कारागृह विभागाच्या समन्वयाने करण्यात येणार आहे. यामुळे समस्येचा शोध व नवीन ज्ञानाची निर्मिती होणार आहे. यामुळे कारागृहाच्या सकारात्मक बाबी देखील समाजासमोर येतील . अश्याप्रकारच्या संशोधनामुळे प्राप्त होणाऱ्या अहवालामुळे सुधारणात्मक बदल घडण्यास मदत होईल,या संशोधनामुळे बंद्यांच्या समस्या तसेच विविध पैलूंवर प्रकाश टाकता येणार आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसतुरुंगविद्यार्थी