Join us

मृत्यूच्या दोन दिवसांनंतर कैद्याची वैद्यकीय जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:05 AM

मानवतेच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जगण्याने छळले होते...मरणाने केली सुटका..., या कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध गझलेप्रमाणे एका वयोवृद्ध आरोपीची मृत्यूनंतर दोन दिवसांनी जामिनावर सुटका करण्याचा प्रकार सत्र न्यायालयात घडला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल गायके यांनी ११ मे रोजी ६२ वर्षीय दत्ताराम पवार यांची सहा महिन्यांसाठी वैद्यकीय जामिनावर सुटका केली. मानवतेच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला. 

पवार यांना २०२१ मध्ये फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. ३ मे रोजी त्यांनी वैद्यकीय जामीन अर्ज दाखल केला होता. आपल्याला मधुमेह असून फुप्फुस व मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहे, असे त्यांनी जामीन अर्जात म्हटले होते.  जे. जे. रुग्णालय तसेच तुरुंगात वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे ३० एप्रिल २०२३ रोजी  पाय कापावा लागल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. जे.जे.मध्ये आयसीयूमध्ये ठेवण्याऐवजी जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे पवार यांची तब्येत खालावली आणि फुप्फुसात इन्फेक्शन झाले, असे त्यांनी म्हटले होते. एस्कॉर्टसाठी पैसे देणे परवडणारे नसल्याने पवार यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी वैद्यकीय जामीन मागितला होता.

...तोपर्यंत आरोपीचा झाला मृत्यू

१० मे रोजी न्यायालय अन्य कामकाजात व्यस्त असल्याने न्यायालयाने ११ मे रोजी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. २३ एप्रिल रोजी पवार यांनी उच्च न्यायालयातही जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला होता. मात्र, कारागृह प्रशासनाला त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेण्यास भाग पाडण्यात आले.

४ मे रोजी जामीन अर्जावर पहिली सुनावणी झाली. सर्व पक्ष उपस्थित असल्याने न्यायालयाने सरकारी वकिलांना आरोपीची वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. ८ मे रोजी जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली. पवार यांचे वकील करीम पठाण यांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते तुरुंगातील वातावरणात आणखी काही दिवस काढणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. परंतु, त्याच दिवशी तक्रारदाराने वकिलांशी संपर्क साधून दुसऱ्याच दिवशी पवार यांच्या जामीन अर्जात मध्यस्थी अर्ज दाखल करत त्यांच्या जामिनाला विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

 

टॅग्स :मुंबई