आता कैद्यांना कारागृहातही मिळणार गोडधोड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:28 AM2024-02-02T10:28:34+5:302024-02-02T10:30:12+5:30
कारागृहात कैद्यांना रोजगार, शिक्षणासह करमणुकीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मुंबई: कारागृहात कैद्यांना रोजगार, शिक्षणासह करमणुकीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुसरीकडे त्यांच्या कॅन्टीनमध्येदेखील गोडधोड पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. सोबत सर्व प्रकारच्या पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे. कांदा आणि लसूणविरहित जेवणाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
• राज्यात एकूण ६० कारागृहे असून, यात ९ मध्यवर्ती, ३० जिल्हा, २० खुले कारागृहे व १ किशोर सुधारालय आहे. यामध्ये एकूण ४१ हजार ९८० कैदी आहेत
• अनेकदा परराज्यात तसेच दूर राहण्यास असल्यामुळे बंदीचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. अशावेळी कैद्यांमध्ये नैराश्य वाढू शकते. यासाठी २०१४ पासून कैद्यांसाठी दूरध्वनी सुविधेची उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्येही अद्ययावत यंत्रणांची जोड देत तो संवाद अधिक सोईस्कर करण्यात आला आहे.
करमणूक अन् बरंच काही :
कारागृहात सध्या कार्यान्वित असलेल्या ऑनलाइन मुलाखत नोंदणी, स्मार्ट कार्ड फोन सुविधा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नातेवाइकांच्या भेटीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच वेळोवेळी विविध करमणुकीचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.राज्यातील कारागृहांमध्ये दहशतवादी, नक्षलवादी, गँगस्टर असे बंदी निवडण्यात येऊन एका कारागृहातून दुसन्या कारागृहात वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच कारागृहातील एका सर्कलमधील बंदी ग्रुप तोडून वेगवेगळ्या सर्कल व बरॅकमध्ये वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचेही कारागृह विभागाने नमूद केले. राज्यातील कारागृहांतील प्रत्येक बरॅकमध्ये पॅनिक बटन लावण्यात येणार आहे.