कैद्यांना मिळतोय व्हिडीओ कॉलचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:26 AM2021-02-10T02:26:12+5:302021-02-10T02:27:48+5:30
कैद्यांची कारागृहातील घुसमट झाली कमी
मुंबई : लॉकडाऊन जाहीर होताच जग ठप्प झाले. कारागृहाच्या कोंडवाड्यातील कैद्यांची घुसमट वाढली. नातेवाइकांसोबत संपर्क तुटल्याच्या भावनेतून अनेकींच्या अश्रूंंना बांध फुटला. काही दिवसांतच प्रशासनाकडून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यातील मुलाखती सुरू ठेवल्या. गेल्या १० महिन्यांत हेच व्हिडिओ कॉल, कॉल कैद्यांसाठी आधार ठरले आहेत.
महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह असून, त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. यात एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालानुसार, कारागृहाची एकूण क्षमता २४ हजार ९५ इतकी असताना, कारागृहात एकूण ३६ हजार ७९८ कैदी आहेत. राज्यभरातील कारागृहामध्ये एकूण १ हजार ५६९ महिला कैदी आहेत.
यापैकी मुंबईत दोन मध्यवर्ती आर्थर रोड, भायखळा कारागृह आहेत. भायखळा येथे असलेल्या महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. यात ७२ महिला या आपल्या मुलांसोबत कारागृहात आहेत. २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर होताच सगळेच ठप्प झाले होते. दहा महिन्यांपासून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता आले नाही. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या भेटी घडवून आणल्या जात आहेत. कैद्यांसाठी हे आधार ठरत आहे, तर आर्थर रोड कारागृहातही हेच चित्र आहे.
कॉलआधी पोलीस पडताळणी
कैद्यांना ज्या नातेवाइकांसोबत बोलायचे आहे, त्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकाची आधी स्थानिक पोलिसांकड़ून पडताळणी होते. त्यानंतर संबंधित कैद्याला आठवड्यातून एकदा बोलण्याची मुभा आहे. ज्या नातेवाइकांकडे स्मार्ट फोन आहे ते व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत आहेत. तर ज्यांच्याकडे नाही ते साध्या फोनवरून संपर्क साधत आहेत.
कपड्यांतून मायेची ऊब
कैद्यांना कुटुंबियांकडून येणारे कपडे स्वीकारण्यात येत आहेत, अशात, त्यातूनच मायेची ऊब त्यांना मिळत आहे.
लवकरच मुलाखती सुरू
लवकरच कारागृहात मुलाखती सुरू करण्यात येणार असल्याचे कारागृहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भायखळा महिला कारागृहाची क्षमता २६२
कैद्यांची संख्या - ३६३