धर्मादाय रुग्णालयांकडून कैद्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:06 AM2018-07-03T02:06:58+5:302018-07-03T02:08:07+5:30
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या पुढाकाराने अलीकडेच तुरुंगातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यातील विविध तुरुंगातील एकूण बारा हजार कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या पुढाकाराने अलीकडेच तुरुंगातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यातील विविध तुरुंगातील एकूण बारा हजार कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील अनाथ आणि गरीब रुग्णांच्या मोफत आरोग्य तपासणी मोहिमेनंतर धर्मादाय रुग्णालयांनी तुरुंगातील कैद्यांची आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली. मुंबईत लीलावती रुग्णालयाने आॅर्थर रोड तुरुंग, पुण्यात रूबी, जहांगीर आदी धर्मादाय रुग्णालयांनी येरवडा तुरुंगातील कैद्यांची तपासणी केली. धर्मादाय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर या आठ विभागांतील २५ तुरुंगांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. पुणे विभागात सर्वाधिक ५,४०० कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक विभागात २,१११, नागपूर विभाग १,६७९, अमरावती विभाग ९५९, कोल्हापूर विभाग ५६०, मुंबईत ५२६, लातूर विभाग १९०, तर औरंगाबाद विभागात १७३ कैद्यांची तपासणी करण्यात आली. कैद्यांमध्ये प्रामुख्याने त्वचा, दात आणि डोळ्यांच्या संबंधित तक्रारी आढळून आल्या, तर मुंबईतील कैद्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या तक्रारी आढळल्या. कैद्यांच्या तपासणीनंतर आवश्यक औषधोपचार केले. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.
कैदीसुद्धा समाजाचा घटक असून, या दुर्लक्षित घटकाला आरोग्य सुविधा मिळाव्यात, आरोग्याबाबत कैद्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी धर्मादाय आयुक्तालय, धर्मादाय रुग्णालयांनी तुरुंग प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. कैद्यांसाठी अशाप्रकारची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचे आवाहन धर्मादाय रुग्णालयांना केले होते. या आवाहनाला रुग्णालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले.
असे उपक्रम भविष्यातही सुरू राहावेत
धर्मादाय आयुक्तालयाच्या या उपक्रमाचा सकारात्मक परीणाम दिसतो आहे. राज्यातील नामवंत रूग्णालयातील डॉक्टरांकडून कैद्यांची आरोग्य तपासणी होत आहे. हा एक चांगला उपक्रम असून यापुढेही अशाप्रकारे कैद्यांची आरोग्य तपासणी शिबिरे व्हावीत, यासाठी आम्ही धर्मादाय आयुक्तालयाच्या संपर्कात आहोत, अशी माहिती कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.के.उपाध्याय यांनी दिली.