मुंबई - राज्यात कोरोना विरोधी लसीचा तुटवडा निर्माण होऊन अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आक्रमपणे आपली भूमिका मांडत आहेत. भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर खापर फोडलं आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने दुजाभाव केल्यानेच राज्यात लशींचा मोठा तुटवडा झाल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारच्या दुजाभावाचं पत्रच सोशल मीडियातून शेअर केलं आहे.
कोरोना विरोधी लसीच्या पुरवठ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा केला जात असला तरी त्याचा वेग अतिशय मंद असल्यानं आवश्यक लसींचा साठा नसल्याची टीका राज्य सराकरकडून केली जात आहे. केंद्राकडन केल्या जाणाऱ्या दुजाभावामुळे जनतेचे हाल होत असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर राज्यांच्या गरजेनुसार आणि लसीकरणाची क्षमता पाहून केंद्राकडून लसीचा पुरवठा सुरू आहे. यात महाराष्ट्रालाच सर्वाधिक लसीचा पुरवठा आजवर झाला आहे, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, केवळ लसींच्या बाबतीत नाही, तर इतर वैद्यकीय उपकरणे पुरविण्यातही महाराष्ट्रासोबत भेदभाव केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांना रुग्णसंख्येच्या कितीतरी अधिक पटीने N 95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय त्या राज्यांना वाटपात प्राधान्य असायला हवं. पण, तसे आकड्यांवरुन तरी दिसत नाही. ज्या राज्यांमध्ये सध्या कोरोना सर्वाधिक वाढतोय त्यात ना गुजरात आहे ना उत्तर प्रदेश पण तरीही सर्वाधिक साहित्य या राज्यांना आहेत, असे म्हणत चव्हाण यांनी आकडेवारीच शेअर केली आहे.
पाकिस्तानला लस देण्याअगोदर महाराष्ट्राला द्या
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. "राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चाचली आहे. देशातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस पुरवण्यापेक्षा आधी महाराष्ट्राला लस द्याव्यात", अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.