मुंबई : चर्चगेट येथील रवींद्र मेन्शन इमारतीच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अर्धा तास अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या पाच मिनिटांत बंद पडलेल्या लिफ्टचे दरवाजे तोडून चव्हाण आणि त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस पदाधिका:यांना सुखरूप बाहेर काढले.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी 6.5क् वाजता चर्चगेट येथील रवींद्र मेन्शन या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावर बंद पडलेल्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने रवाना झाले. तेव्हा लिफ्ट इमारतीच्या तळमजल्यावरच होती, मात्र तिचे दरवाजे उघडत नव्हते. हे लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजे तोडले आणि अवघ्या पाचच मिनिटांत चव्हाण यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, रवींद्र मेन्शनची लिफ्ट बंद पडण्यामागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी याबाबत अधिक तपास केला जाईल, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. (प्रतिनिधी)