आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 09:29 PM2021-03-30T21:29:07+5:302021-03-30T21:30:02+5:30
Prithviraj Chavan: राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच खटके उडत असताना आता काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
Prithviraj Chavan: राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच खटके उडत असताना आता काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. "आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा", असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे. चव्हाण यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढून लॉकडाऊन करण्याआधी राज्य सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत.
"राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे", असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
If another lockdown is inevitable Govt. must compensate loss of wages by direct cash transfer. If need be MLALAD and MPLAD funds can be diverted. My press release - pic.twitter.com/Kj9RlOAaXX
— Prithviraj Chavan (@prithvrj) March 30, 2021
संपूर्ण लॉकडाऊनला केला विरोध
पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष देऊन आधी या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊचा विचार करा, असा सल्ला दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्या कोणत्या?
>> लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या
>> लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ठेवायला हवा
>> लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. याकाळात प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा.
>> खासगी वाहनातून प्रवासाला मुभा देणे
>> शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होता कामा नये.
>> लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवणे