साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पोटनिवडणूक लढवणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 04:15 PM2019-09-14T16:15:42+5:302019-09-14T16:16:17+5:30
राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हाती कमळ घेतलेल्या उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
मुंबई - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हाती कमळ घेतलेल्या उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. साताऱ्यात उदयनराजेंविरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपा प्रवेश केल्यामुळे साताऱ्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली असून, त्याठिकाणी लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, उदयनराजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यासाठी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून तेथून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केला आहे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. निस्वार्थ भावेनेतून लोकांच्या हितासाठी भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते.