Join us

'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 5:27 PM

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी एकत्र विधानसभा लढवणार असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

Maharashtra Politics ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची चर्चा जोरदार सुरू आहेत. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका लढणार आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीत छोटा भाऊ आणि मोठा भाऊ कोण यावरुन चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

Sharad Pawar : 'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षात आहे बघून त्यांना उमेदवारी देणार आहे. मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन निर्णय घेऊ, आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे, असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

 या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला. शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.    

आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले.  अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणे अनेक आहेत. पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही कशाला काय सांगू," अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस