- महेश चेमटे मुंबई : दक्षिण मुंबईत खासगी बस प्रवेश बंदीबाबत वाहतूक पोलिसांच्या निर्णयाविरुद्ध मुंबई बसमालक संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारसह शनिवारी प्रवेशबंदीवर तोडगा न निघाल्यास मुंबई महानगर क्षेत्रातील ३३ हजार बसचालक मंगळवार (१९ सप्टेंबर) आणि बुधवारी (२० सप्टेंबर) या दिवशी संपावर जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे. तर दुसरीकडे वाहतूककोंडी सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांच्या अडचणी वाढतच असल्याचे चित्र आहे.वाहतूक पोलिसांच्या आदेशाविरुद्ध मुंबई बसमालक संघटनेच्या वतीने गुरुवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. सायन येथील नित्यानंद सभागृहात झालेल्या बैठकीत वाहतूक पोलिसांच्या आदेशावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या काळात ट्रॅव्हल कार्यालये बंद राहणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील डेली बस सेवा, स्कूल बस सेवा, कंपनी बस सेवा अशा मिळून तब्बल ३३ हजार बसगाड्या संपात सहभागी होणार आहेत. संपकालीन दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास अनिश्चित काळासाठी संप पुकारला जाईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.मेट्रोची कामे आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर वाहतूककोंडी वाढत आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने ६० दिवस खासगी बसचालकांना दक्षिण मुंबईत प्रवेशबंदी केली आहे. ही बंदी प्रायोगिक तत्त्वावर आहे. या बंदीनुसार बुधवारी वाहतूक पोलिसांनी बसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खासगी बसला १ हजार २०० रुपयांचा तर कंपनीमधील कर्मचाºयांची वाहतूक करणाºया बसला १ हजार ४०० रुपयांचा दंड आकारत कारवाई सुरू करण्यात आली.सध्या सुरू असलेल्या कारवाईचा फटका अप्रत्यक्षरीत्या प्रवाशांनाही बसत आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे खासगी बसला दंड करण्यात येत असून, या प्रक्रियेमुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी उशीर होतो. प्रशासनाच्या गलथानपणामुळे प्रवाशांच्या रोषाला आम्ही सामोरे का जावे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.स्कूल बसचालकही अस्वस्थवाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार स्कूल बस शाळेसमोर उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्कूल अॅग्रिमेंट आणि परमिट, फिटनेसशिवाय शहरात २१ हजारपेक्षा जास्त स्कूल व्हॅन सुरू आहेत.वळाडा डेपो येथे पार्किंगसाठी प्रत्येकी एक हजार रुपये आकारले जातात. परिणामी पार्किंगचे भाडे वसूल करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या फीमध्ये २२२ रुपये वाढ करावी लागेल, अशी माहिती स्कूल बस संघटनेचे अनिल गर्ग यांनी दिली.वाहतूक विभागाचे आयुक्त यांच्याशी स्कूल बसचालकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. गर्ग यांनी शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यातील चर्चेचा तपशील सांगितला.
३३ हजार बसचालक संपावर जाणार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानंतर १९-२० सप्टेंबरला खासगी बस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 5:24 AM