खासगी क्लासेसवर निर्बंध हवेच!
By admin | Published: July 24, 2015 02:53 AM2015-07-24T02:53:45+5:302015-07-24T02:53:45+5:30
पालकांकडून लाखो रुपयांची फी उकळणाऱ्या क्लासेसविरोधात कायदा करत असल्याची घोषणा बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली
मुंबई : पालकांकडून लाखो रुपयांची फी उकळणाऱ्या क्लासेसविरोधात कायदा करत असल्याची घोषणा बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करत सिन्हाल, सिनॅप्स आणि रेझोनन्स क्लासचा भांडाफोड केला होता. त्याचा उल्लेख करत शिक्षणमंत्र्यांनी उचललेल्या पावलाचे शैक्षणिक संघटनांनी स्वागत केले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी उचललेले पाऊल फार आधीच उचलण्याची गरज मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव आशीर्वाद लोखंडे यांनी व्यक्त केली. लोखंडे म्हणाले की, पैशांनी शिक्षण घेता येत नाही, हे अद्याप पालकांना कळलेले नाही. विद्यार्थ्यांना मेहनत आणि प्रामाणिकपणे उत्तीर्ण होण्याऐवजी पालकच चुकीचा मार्ग दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. या कायद्याच्या माध्यमातून सरकारने कॉलेज प्रशासन आणि क्लासेसवर नियंत्रण ठेवायला हवे. कारण कित्येक क्लासेसने कॉलेजसचा ताबा घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये क्लासेसला स्टॉल लावायलाही बंदी घातली पाहिजे. कारण सरस्वतीची पूजा करणाऱ्यांनी लक्ष्मीचे व्रत घ्यायलाच नको, अशी संघटनेची भूमिका आहे.
प्रस्तावित कायद्यात सर्व क्लासेस शिक्षण उपसंचालकांच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले की, क्लासेस आणि कॉलेजचे साटेलोटे असले, तरी त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे क्लासेस शिक्षण उपसंचालकांच्या नियंत्रणाखाली आल्यास कुरापतींना काही प्रमाणात तरी चाप बसेल. तरी प्रस्तावित कायद्यात आणखी कोणत्या बाबींचा समावेश करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी मनविसे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट करतील. (प्रतिनिधी)