Join us

शाळासोबत खासगी कोचिंग क्लासेसनाही हवी वर्ग सुरु करण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला, मंदिरे आणि नाट्यगृहेही सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला, मंदिरे आणि नाट्यगृहेही सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली. मात्र, अद्यापही कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनपासून राज्यातील खासगी शिकवण्या बंद आहेत. त्यामुळेे या व्यावसायिकांपुढे विविध अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावी वर्गांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर या भागातील खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनांकडून होत आहे.

कोचिंग क्लासेस व्यवसाय ही शाळा, महाविद्यालयांना समांतर अशी शिक्षण व्यवस्था आहे. शासनाला त्याचा विसर पडला आहे. शासनाने ज्याप्रमाणे सर्व नियम पळून शाळा सुरु करण्याची परवानगी दिली, तशीच क्लासेस सुरु करण्यालाही द्यावी, तसा अध्यादेश काढावा किंवा शाळांच्या शासन निर्णयात क्लासेसचाही उल्लेख करावा, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी केली आहे.

कोचिंग क्लासेस ही व्यवस्था पालकाच्या संमतीने व पालकांच्याच आर्थिक पाठबळाने राज्यामध्ये कित्येक वर्षांपासून सुरू असून, राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत कोचिंग क्लासेसचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. राज्याच्या अनेक भागात गेल्या चार महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये जरी बंद असली तरी कोचिंग क्लासेस व्यवसाय हे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनासुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी असून, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर पडू नयेत, याचीसुद्धा चिंता आहे. शासनाकडून या व्यवस्थेला यावेळीही डावलले गेले असून, अद्याप क्लासेस सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. ज्या अटी, शर्ती, नियम शाळांना लागू केले आहेत, ते लागू करून खासगी क्लासेसलाही परवानगी द्यावी, अशी मागणी भुयार यांनी केली आहे.

ऑनलाईन काळात शाळा बंद असताना खासगी शिकवण्यांमुळे विद्यार्थ्यांना आधार मिळाला मग आता शाळा सुरु करताना क्लासेसला का डावलले जात आहे, अशी प्रतिक्रिया कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सल्लागार सचिन कर्णावत यांनी दिली. वर्गांचे निर्जंतुकीकरण, मास्क, शिक्षकांचे लसीकरण, ५० टक्के उपस्थिती या सर्व नियमांचे पालन खासगी क्लासेमध्येही केले जाईल. त्यामुळे शासनाने आता खासगी क्लासेस सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्णावत यांनी केली आहे.