मुंबई : खासगी कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे एसटीची शिवशाही तक्रारींच्या कचाट्यात सापडली आहे. यामुळे एसटीची प्रतिमा मलिन होते. एसटीची प्रतिमा सुधारण्यासाठी खासगी कंत्राटदारांवर जबर बसविणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाची अत्याधुनिक आणि वातानुकूलित ओळख असलेल्या शिवशाहीची शनिवारी वर्षपूर्ती आहे. यानिमित्त महामंडळातील अधिकाºयांशी संवाद साधला.शिवशाहीच्या वर्षपूर्ती निमित्त महामंडळातील वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भाडेतत्वावरील शिवशाहीमध्ये चालक हा खासगी कंत्राटदारांचा असून वाहक महामंडळाचा आहे. एसटीतील राज्यात धावत असलेल्या बहुतांश शिवशाहीच्या तक्रारी येत आहेत. यात एसी बंद असणे, दारु पिऊन वाहन चालवणे, अपघात स्थळावरुन गाडी सोडून पळ काढणे अशा तक्रारींचा समावेश आहे. यामुळे वातानुकूलित आणि अत्याधुनिक असा चेहरा असलेली शिवशाही सध्या तक्रारींच्या कचाट्यात अडकली आहे. या सोडवण्यासाठी खासगी कंत्राटदारांवर महामंडळाने जरब बसवणे गरजेचे आहे.‘शिवशाहीच्या उत्पन्नाबाबत महामंडळ समाधानी आहे. सध्या राज्यात धावत असलेल्या शिवशाहीचा सरासरी उत्पन्न ४२ रुपये प्रति किलोमीटर आहे तर शिवशाहीचे भारमान सुमारे ६०-६५ टक्के आहे’, असे महामंडळाने सांगितले.प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंद मिळावा, यासाठी महामंडळाने भाडेतत्वावर दोन हजार शिवशाही घेण्याचा निर्णय घेतला. यानूसार ११ खासगी आॅपरेटर नियुक्त करुन महामंडळाने शिवशाही सुरु केली. ९ जून २०१७ रोजी मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिली बैठे आसनांची शिवशाही धावली. अखेर दहा महिन्यानंतर ४ एप्रिल २०१८ रोजी शहादा-पुणे मार्गावर पहिली शयनयान शिवशाही धावली.महामंडळाच्या ताफ्यात टप्याटप्याने दोन हजार शिवशाही दाखल होणार आहेत.राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या सहा प्रदेशातील एकूण २८० मार्गावर ८३८ शिवशाही धावत आहेत. यात स्वमालकीच्या ४६३ आणि खासगी कंत्राटावरील ३२५ शिवशाहींचा समावेश आहे.
खासगी कंत्राटदारांवर जरब हवीच! एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:42 AM