मुंबई : पवई येथे खाजगी कंपनीला दिलेल्या भूखंडाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याची विरोधी पक्षाची मागणी सत्ताधारी शिवसेना-भाजपाने गुरूवारी फेटाळून लावली. यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडाचे श्रीखंड या कंपनीला लाटता येणार आहे, अशी नाराजी विरोधी पक्षाने व्यक्त केली आहे. पवई येथील चार एकर भूखंडाचा भाडेकरार १९ वर्षांनंतर वाढविण्यात आला आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाचा वापर खासगी सहलीकरिता होत आहे.हा भाडेकरार तत्काळ रद्द करण्यासाठी संबंधित प्रस्ताव रिओपन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी पालिका महासभेत केली. मात्र शिवसेना-भाजपा युतीने बहुमताने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संबंधित कंपनीला वार्षिक ११ लाख रुपये भाडे देऊन या भूखंडाचा वापर करता येणार आहे. या भूखंडाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते बुधवारी गेले असता, सदर खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले.
महापालिकेच्या पवईतील मोक्याच्या भूखंडाचा ताबा खाजगी कंपनीकडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:54 AM