Corona Vaccination: गोकुळधाम रिझर्व्ह बॅंक अधिकारी वसाहतीत सुरू झाले खाजगी कोविड लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:28 PM2021-05-22T19:28:28+5:302021-05-22T19:29:18+5:30
Corona Vaccination in Gokuldham Reserve Bank Officer Colony: मुंबईच्या खाजगी गृहनिर्माण वसाहतीत सुरू झाले पहिले लसीकरण केंद्र
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोना मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात येणाऱ्या कोव्हिड 19 च्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी मुंबईमधील सर्व नागरिकांचे लसीकरण हाेणे अतिशय आवश्यक आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी बहुउद्देशीय कंपन्या व राष्ट्रीयकृत बॅंकांची कार्यालये व वसाहती आहेत. सदर कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी एकत्र काम करीत असतात. अशा कार्यालये व वसाहतींमध्ये खाजगी रुग्णालयां बरोबर करार करुन कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यास एका मोठ्या वर्गास लसीकरणाचा लाभ मिळेल.
पालिकेच्या पी दक्षिण वॉर्ड मधील खाजगी वसाहतीमधील पहिले लसीकरण केंद्र रिझर्व्ह बॅंक व्यवस्थापन व फोर्टिस रुग्णालय, मुलुंड यांच्या बरोबर झालेल्या करारानुसार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गोरेगाव पूर्व गोकुळधाम येथील वसाहतीत आज पासून सुरु झाले.
या लसीकरण केंद्राला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया एम्लाॅईज असोसिएशनचे सल्लागार व मुंबई पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस अजित सुभेदार,शिवसेनेचे बोरिवलीचे उपविभागप्रमुख
विनायक सामंत यांनी आज दुपारी भेट दिली व मुंबईत प्रथमच सुरु झालेल्या मोहिमेस शुभेच्छा दिल्या व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया व्यवस्थापनाचे आभार मानले
या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या 18 वर्षांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत
येथील एकूण 1500 कुटुंबाना येत्या तीन चार दिवसात लसीकरणाची
प्रक्रिया पूर्ण होईल.इतर परिसरात राहणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबायांना येथे लसीकरण करता येईल.
मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या विविध वसाहती मध्ये राहणाऱ्या 10000 कर्मचाऱ्यांसह त्यांच्या
कुटुंबियांसाठी लवकर सदर लसीकरण मोहिम राबवण्यात येईल अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला दिली. अश्या प्रकारची लसीकरण मोहिम सुरू करण्यासाठी विविध अस्थापना व गृहनिर्माण संस्थानी पुढाकार घेतल्यास नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण होईल आणि लसीकरण केंद्रा वरचा ताण व गर्दी कमी होईल असा विश्वास आमदार पोतनीस यांनी व्यक्त केला.
यासाठी मुंबई महानगरपालिकेने मार्गदशक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार बहुउद्देशीय कंंपनी अथवा बॅंकांनी त्यांच्या कार्यालय किंवा कर्मचारी वसाहतींमध्ये जागा व यंत्रणा उपलब्ध करुन दिल्यास खाजगी रुग्णालयांबरोबर करार करुन आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करु शकणार आहेत.
सदर खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी
मुंबईचे उपमहापौर अँड. सुहास वाडकर व आमदार विलास पोतनीस व पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.