Join us

गोकुळधाम रिझर्व्ह बँक अधिकारी वसाहतीत सुरू झाले खासगी कोविड लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:06 AM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी मुंबईमधील सर्व नागरिकांचे लसीकरण हाेणे अतिशय आवश्यक आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी बहुउद्देशीय कंपन्या व राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये व वसाहती आहेत. या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी एकत्र काम करीत असतात. अशा कार्यालये व वसाहतींमध्ये खासगी रुग्णालयांबरोबर करार करून कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यास एका मोठ्या वर्गास लसीकरणाचा लाभ मिळेल.

पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डमधील खासगी वसाहतीमधील पहिले लसीकरण केंद्र रिझर्व्ह बँक व्यवस्थापन व फोर्टिस रुग्णालय, मुलुंड यांच्याबरोबर झालेल्या करारानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव पूर्व गोकुळधाम येथील वसाहतीत शनिवारपासून सुरू झाले.

या लसीकरण केंद्राला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लाॅईज असोसिएशनचे सल्लागार व मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस अजित सुभेदार, शिवसेनेचे बोरिवलीचे उपविभागप्रमुख विनायक सामंत यांनी दुपारी भेट दिली व मुंबईत प्रथमच सुरू झालेल्या मोहिमेस शुभेच्छा दिल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाचे आभार मानले.

या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या १८ वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत येथील एकूण १५०० कुटुंबांची लसीकरण प्रक्रिया येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल. इतर परिसरात राहणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना येथे लसीकरण करता येईल.

मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या विविध वसाहतींंमध्ये राहणाऱ्या १०००० कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी लवकरच लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी ‘लोकमत’ला दिली.

अशा प्रकारची लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विविध आस्थापना व गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतल्यास नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण होईल आणि लसीकरण केंद्रावरचा ताण व गर्दी कमी होईल, असा विश्वास आमदार पोतनीस यांनी व्यक्त केला.

यासाठी मुंबई महानगरपालिकेने मार्गदशक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार बहुउद्देशीय कंंपनी अथवा बँकांनी त्यांच्या कार्यालय किंवा कर्मचारी वसाहतींमध्ये जागा व यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास खासगी रुग्णालयांबरोबर करार करून आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करू शकणार आहेत.

हे खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी मुंबईचे उपमहापौर ॲड. सुहास वाडकर व आमदार विलास पोतनीस व पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.

.............................