मुंबई: मंगळवार रात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा फटका चोक्सी कुटुंबियांना बसला आहे. दुबईतून उपचारासाठी मुंबईत आलेल्या प्रीती चोक्सी (६४) यांची ९ तारखेला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी होणार होती. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिजीतने ८ तारखेला दुपारीच एटीएममधून पैसे काढले. पण, ९ तारखेपासून जुन्या नोटांपायी खासगी रुग्णालयात तपासणी नाकारली जात असल्याचे अभिजीत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुबईत स्थायिक असलेले चॉक्सी कुटुंबिय मुळचे मुंबईतले आहेत. अभिजीत यांची आई प्रीती आणि वडील एक महिन्यांपूर्वी दुबईतून मुंबईत आले. प्रीती यांना तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. नियमित तपासणीसाठी ते मुंबईत आले आहेत. त्यांच्या दोन तपासण्या झाल्या. पण, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मधुमेह असण्याची शक्यता वर्तविली. त्यांच्या औषधात बदल करावे लागतील, असे चोक्सी कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यांना ९ तारखेची तपासणी होणे आवश्यक होते. पण, ब्रीच कॅण्डी, भाटिया रुग्णालयाने घेतलेल्या आडमुठ्या धोरणांमुळे माझी आई दररोज आधीपासून सुरु असलेल्या १० ते १२ गोळ््या घेत आहे, असे अभिजीत यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी रद्द नोटा स्वीकारण्याचे सरकारी परिपत्रक दाखविले तरीही या दोन्ही रुग्णालयांत पैसे स्वीकारले गेले नाहीत. शुक्रवारी मी आणि माझ्या आईने रांगेत उभे राहून चार-चार हजार रुपये काढले. आमचे बिल १८ हजार रुपयांचे आहे. आमचे पैसे स्वीकारले नाहीत तर आम्ही काय करायचे? असा सवाल चोक्सी कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ब्रीच कॅण्डी रुग्णालयाशी संपर्क साधला असल्यास संपर्क होऊ शकला नाही. भाटिया रुग्णालयाशी संपर्क साधल्यास शनिवारी त्यांना तपासणीसाठी बोलवल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
खासगी रुग्णालयांची अरेरावी !
By admin | Published: November 12, 2016 5:29 AM