लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबईत लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून खासगी रुग्णालय व्यवस्थापनांनी दर महिन्याला लसींचे २० लाख डोस तर पालिका प्रशासनानेही ३० लाख डोस मिळावेत अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, सध्या दर दिवसाला ५० हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे; मात्र भविष्यात दर दिवसाला एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाच्या नव्या नियमांप्रमाणे पालिकेने खासगी रुग्णालयांकडून लसीची किती गरज आहे याची माहिती जमा केली आहे. नव्या नियमांप्रमाणे देशभरातील लसीच्या उत्पादनांपैकी ७५ टक्के लस केंद्र शासन घेणार आहे आणि उर्वरित २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्र शासनाच्या देखरेखीखाली लसीची खरेदी करण्यात येणार आहे.
नव्या नियमांप्रमाणे खासगी रुग्णालयांना लस उपलब्धतेसाठी राज्य शासनाला समन्वयकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना लसीचे नवे नियम आणि सादर करावी लागणारी माहिती पाठवली आहे. त्याप्रमाणे या व्यवस्थापनाकडून ही माहिती एकत्रित करून केंद्राला पाठविण्यात येईल, तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेकडून खासगी रुग्णालयांची माहिती प्राप्त झालेली आहे.