खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यावी, आमदाराची मागणी
By महेश गलांडे | Published: February 22, 2021 06:27 PM2021-02-22T18:27:52+5:302021-02-22T18:28:47+5:30
पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी
मुंबई - नवी दिल्ली : देशातील काही राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची नवीन प्रकरण समोर येत आहे. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण 1.08 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. तर, राज्यात आत्तापर्यंत जवळपास 9 लाख जणांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारत असल्यामुळे कोरोना लसीकरणाचाही वेग वाढवायला हवा, असे मत अनेकांनी व्यक्त केलंय. मनसेचे एकमेव आमदारराजू पाटील यांनीही कोरोना लसीकरणासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सूचना केलीय.
पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदारराजू पाटील यांनी केलीय. आपल्या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना मेन्शन केलंय.
पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा. @OfficeofUT@rajeshtope11@AjitPawarSpeaks
— Raju Patil (@rajupatilmanase) February 22, 2021
देशभरात लसीकरण मोहिमेतून फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोनाची लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, पुढच्या महिन्यापासून देशात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील लस देण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, देशात सुमारे 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील जवळपास 27 लाख लोक आहेत, ज्यांना दुसर्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाईल. मात्र, 60 वर्षांवरील लोकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, त्यांचे दोन गट केले जातील. ज्यांना लस विनामूल्य दिली जाईल, त्यांचा एक गट असेल. तर दुसऱ्या गटातील लोकांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढली
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून काल (रविवारी) 14264 नवे रुग्ण आढळले व 90 जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण 1.32 टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो 1.42 टक्के झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमध्ये 74 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळमधील आहेत. मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर येथेही दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.