लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह २४ जणांविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवत ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये खासगी प्रयोगशाळेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेचा व्यवस्थापक संजय सोनावणे याला काही दिवसांपूर्वी टाटा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे विविध पाकिटे सापडली. त्यात रोख रक्कम होती. या पाकिटांवर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची नावे लिहिलेली असल्याचे दिसून येताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. जवळपास एक ते दीड लाखाची रोकड या पाकिटात होती. टाटा रुग्णालयात विविध चाचण्यांसाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आरोपी कर्मचारी गांधी रुग्णालयाजवळील एका खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करण्यास सांगत होते. त्या रुग्णांच्या बदल्यात प्रयोगशाळेतून कमिशन मिळत होते. अखेर रुग्णालय प्रशासनाकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी व्यवस्थापकासह ११ जणांना अटक केली.