मीरारोड - मीरा भाईंदर मधील काही खाजगी शाळा पालकां कडून गणवेश , वह्या - पुस्तके खरेदी आदींची सक्ती करण्यासह मनमानी शुल्क आकारणी करत असल्याच्या पालकांच्या वाढत्या तक्रारी पाहता खाजगी शाळांच्या प्रतिनिधींना शिक्षण विभागा मार्फत कायदे - नियमांचे पालन करण्याचे धडे दिले गेले.
शहरातील अनेक खाजगी शाळांबाबत आमदार गीता जैन यांच्याकडे पालकांच्या विविध तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी शहरातील खाजगी शाळांच्या मुख्याध्यापका समवेत बैठकीचे आयोजन भाईंदरच्या जे . एच . पोद्दार शाळेत करण्यात आले होते . यावेळी आ. जैन सह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, शिक्षण विभागाचे उपायुक्त अजित मुठे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन, सहाय्यक शिक्षण निरीक्षक बाबासाहेब चिमणे, ठाणे माध्यमिक विभागाच्या विस्तार अधिकारी वर्षा सोनटक्के, ठाणे प्राथमिक विभागाचे विस्तार अधिकारी ज्ञानदेव निपुर्ते आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पालक-शिक्षक संघाची निवड करताना शाळेने सविस्तर माहिती प्रशासनास देऊन मतदानाद्वारे संघाची निवड करावी. कारण काही शाळा परस्पर त्यांच्या मर्जीनुसार पालक निवडत असतात . कोणत्या ही शाळेने पालकांकडून एक रक्कमी फी भरण्याची जबरदस्ती करू नये असे मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. अभ्यासक्रम बदलला नसल्यास शाळेतून पुस्तके घेण्याची तसेच गणवेशची सक्ती करता येणार नाही . गणवेश बदलला नसल्यास तो गणवेश पुढच्या शैक्षणिक वर्षात सुद्धा वापरण्यासाठी परवानगी दिली जावी. काही शाळा प्रत्येक शैक्षणिक वर्षात पालकां कडून प्रवेश फी आकारात असल्याचे निदर्शनास आल्याने शाळांनी फक्त एकदा सुरुवातीच्या वर्षात प्रवेश घेताना प्रवेश शुल्क आकारण्यात आले पाहिजे. अतिरिक्त शालेय शुल्क आकारू नये तसेच शालेय शुल्क भरले नाही म्हणून विध्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जात नाही हे गंभीर असून त्याचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याने असे प्रकार केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा. शालेय नियमांची माहिती पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात . शहरातील सर्व शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश आ. गीता जैन यांनी यावेळी दिले . अश्या प्रकारची बैठक पहिल्यांदाच बोलावण्यात आल्याने यातून पालक आणि विध्यार्थी यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली .