खासगी सुरक्षा रक्षकांनाही आता रेल्वे प्रवासाची मुभा; सर्वसामान्यांसाठी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 05:04 PM2020-10-22T17:04:03+5:302020-10-22T17:06:40+5:30
Mumbai Local : दोन दिवसांपूर्वी महिलांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी दिल्यानंतर आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू आहे. यातच दोन दिवसांपूर्वी महिलांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी दिल्यानंतर आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. यामध्ये गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील खासगी सेवेत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेले उपनगरीय रेल्वेचे दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता आहे. लोकल सेवेसंदर्भात बुधवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी तसेच विविध संघटनांमध्ये बैठक झाली. या संयुक्त बैठकीत कोणत्या संघटनेत किती कर्मचारी आहेत, रेल्वेत सध्या किती कर्मचारी काम करतात, याचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य सरकारचे अधिकारी, रेल्वे अधिकारी आणि विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
पुढील दोन ते तीन दिवसांतच होणार निर्णय - वडेट्टीवार
सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आता मुंबईकरांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत म्हणाले की, संस्था, संघटनांपैकी कोणत्या घटकांना अत्यावश्यक सेवेत प्रवासाची मुभा द्यायची यावर चर्चा झाली. लोकलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने बोलणे टाळले.
महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा
महिलांच्या लोकल प्रवासासाठी आम्ही सज्ज असून स्थानकावरील गर्दी टाळण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. उपनगरी रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवा आणि इतर क्षेत्रांतील प्रवाशांसाठी खुली केली जात आहे. आता खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना लोकलमधून प्रवासास परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा असणार आहे.