मुंबई : नवी दिल्लीतील खाजगी टॅक्सीचालकाकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाजगी टॅक्सी कंपन्यांनीही पावले उचलावीत, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या होत्या. यासाठी झालेल्या बैठकांमध्ये एखादा आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास प्रवाशाच्या मदतीसाठी टॅक्सीत ‘पॅनिक बटण’ असावे यावर चर्चा झाली होती. अखेर परिवहन विभाग आणि खाजगी टॅक्सी कंपन्यांमध्ये यावर एकमत झाले आहे. मात्र पॅनिक बटण बसविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्याने थोडा अवधी टॅक्सी कंपन्यांनी मागितल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. नवी दिल्लीतील उबर टॅक्सीचालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही तरुणी झोपेत असताना निर्जनस्थळी टॅक्सी नेत चालकाने हे कृत्य केले. तिला कुठलाही प्रतिकार करता आला नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महिला प्रवाशांबरोबर अन्य प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन विभाग आणि खाजगी टॅक्सी कंपन्यांमध्ये डिसेंबरमध्ये बैठकाही झाल्या. चालक, वाहन यांची माहिती टॅक्सी कंपन्यांनी परिवहन विभागाला सादर केल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवालही सादर करण्यास टॅक्सी कंपन्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या अगोदर सर्व टॅक्सी कंपन्यांनी अहवालही सादर केले. महत्त्वाची बाब म्हणजे टॅक्सी कंपन्या आणि परिवहन विभाग यांच्यात वारंवार झालेल्या बैठकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टॅक्सीत ‘पॅनिक बटण’ असावे यावर चर्चाही झाली. अशा प्रकारचे बटण असावे यावर परिवहन विभागाने जोर दिला होता. अखेर यावर परिवहन विभाग आणि खाजगी टॅक्सी कंपन्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तसेच टॅक्सींमध्ये काही बदल करण्यासाठी अवधी लागणार असल्याने खाजगी टॅक्सी कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी मागितल्याचे सांगण्यात आले. १५ जानेवारीपासून सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन विभागाकडूनच देण्यात आले असून, अन्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यास टॅक्सी कंपन्या तयार आहेत. तर पॅनिक बटणसाठी तयारी झाल्यास तेदेखील १५ जानेवारीपासून अंमलात आणू अन्यथा थोडा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)टॅक्सीत प्रवाशाच्या सीटवर एका बाजूला पॅनिक बटण असेल. आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास प्रवासी या बटणाचा वापर करू शकतो. हे बटण दाबल्यास त्याची माहिती संबंधित कंपनीच्या कॉल सेंटरला जाईल आणि त्याची माहिती पोलिसांनाही मिळेल. प्रवाशाने आपल्या नातेवाइकाचे नावही नोंदविले असेल, तर त्यालाही याची माहिती मिळेल. बटण दाबल्यास टॅक्सीची संपूर्ण लाईट सतत पेटती राहणे, हॉर्न वाजत राहणे असे प्रकारही होतील. मुंबईत एसएमएस टॅक्सी कॅब्ज, लाईव्ह मार्इंड सोल्युशन, मेरु कॅब, कारझॉनरेंट इंडिया प्रा.लि., प्रियदर्शनी टॅक्सी, टॅक्सी फॉर शुअर, उबेर कॅब, ओला, कॅब्जो, टॅब कॅब, मेरु फॅक्ल्सी कॅब आहेत.