मॉलमध्ये जाण्यासाठी खासगी वाहनच बरे! ४० टक्क्यांहून अधिक मुंबईकरांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:09 AM2019-11-26T04:09:02+5:302019-11-26T04:09:48+5:30
शहरातील वाढती मॉल संस्कृती मुंबईकरांसाठी नवी नाही. कधी सहज फिरायला म्हणून, कधी विंडो शॉपिंगसाठी तर कधी खाण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी मुंबईकर मॉलला पसंती देतात.
- सीमा महांगडे
मुंबई : शहरातील वाढती मॉल संस्कृती मुंबईकरांसाठी नवी नाही. कधी सहज फिरायला म्हणून, कधी विंडो शॉपिंगसाठी तर कधी खाण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी मुंबईकर मॉलला पसंती देतात. मात्र मॉलला जाताना प्रतिष्ठेचे म्हणून ४० टक्क्यांहून अधिक मुंबईकर स्वत:च्या खासगी गाडीचा वापर करण्यासच प्राधान्य देतात. आयआयटी मुंबईच्या काही प्राध्यापकांनी अभ्यासाअंती केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे.
आयआयटी मुंबईच्या काही प्राध्यापकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४० टक्क्यांहून अधिक मुंबईकर जे मॉल्समध्ये शॉपिंगसाठी येतात ते स्वत:ची खासगी गाडी आणणे पसंत करतात, तर सिनेमे पाहायला येणे, मनोरंजन आणि विश्रांतीसाठी आलेले मुंबईकर मॉलमध्ये चालत येणे सोयीचे ठरत असल्याचे सांगतात. दुसरीकडे मॉल्समध्ये काम करणारे कर्मचारी सर्वाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या अभ्यासासाठी मुंबईतील सर्वाधिक गर्दी असलेले ५ शॉपिंग मॉल्स निवडण्यात आले होते आणि तेथे येणाऱ्या ६५० जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांचे लिंग, वय, व्यवसाय, उत्पन्न, गाडी आहे की नाही, त्यांचे मॉलला भेट देण्याचे कारण, वेळ या सर्वांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मॉलला भेट देणाºया ४० टक्क्यांहून अधिक मुंबईकरांनी आरामदायी प्रवासासाठी स्वत:ची खासगी गाडी वापरण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले, तर मनोरंजन आणि तत्सम गोष्टींसाठी आलेल्या लोकांनी पायी चालत येणे जास्त सोयीचे असल्याचे सांगितले. यामधील ४७.१ टक्के लोक शॉपिंगसाठी, ९.२ टक्के हॉटेलिंग, खाण्यासाठी, १२.५ टक्के लोक लहान मुलांच्या मनोरंजनासाठी, सिनेमे पाहण्यासाठी तर २१.५ टक्के सहज विश्रांती आणि वेळ घालविण्यासाठी मॉलला भेट देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.
मॉलमध्ये येण्यासाठी ५५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक खासगी वाहनांचा वापर तर १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण रिक्षा, बससह दुचाकी वाहनांचा वापर करताना दिसून आले.
मुंबईकरांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ होताना खासगी वाहनांचा वापर वाढत असल्याचे यातून समोर आल्याची महिती आयआयटी सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे प्राध्यापक आणि सर्वेक्षणाचे प्रमुख गोपाळ पाटील यांनी दिली.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर
७० टक्के मुंबईकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर दैनंदिन कामासाठी करत असले तरी मॉलला जाताना मात्र त्यातील २० टक्के लोकच हा वापर प्रत्यक्षात करताना दिसतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर खात्रीशीर आणि आरामदायक असेलच असे नाही हे कारण देऊन आरामदायक प्रवासासाठी मुंबईकर कुटुंबासोबतचा मॉल प्रवास खासगी वाहतूक व्यवस्थेने करण्यास प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचमुळे शनिवारी, रविवारी मॉल्समधील गर्दीसोबत परिसरातील रस्त्यांवर दुचाकी आणि रिक्षांची गर्दी पाहायला मिळते.