कचरा उचलण्यासाठी खासगी गाड्या, महापालिका करणार पाच कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:58 AM2017-09-05T02:58:48+5:302017-09-05T02:59:02+5:30
मुंबईमधील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेने गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. या गाड्यांनी भाड्यापोटी वार्षिक पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.
मुंबई : मुंबईमधील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेने गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. या गाड्यांनी भाड्यापोटी वार्षिक पाच कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र, सात परिमंडळातील कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांपैकी, एका ठेकेदाराने तीन परिमंडळांमध्ये वेगवेगळे दर लावले आहेत. त्यामुळे या प्रस्तावावर स्थायी समितीमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या २४ विभागांतून कचरा उचलला जातो. त्यासाठी पालिकेच्या व कंत्राटी गाड्यांचाही वापर केला जातो. मात्र, गाड्यांवरील खर्च कमी करण्यासाठी, पालिकेने कंत्राटी टेम्पो घेण्यास सुरुवात केली, त्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. गेल्या कंत्राटाचा कालावधी ३१ मे २०१७ रोजी संपुष्टात आला आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने दरपत्रक मागवून, या ठेकेदाराला काम दिले, त्याचाही कालावधी १६ आॅगस्टला संपला आहे.
असे आहेत दर -
पालिकेने आता नव्याने कंत्राट काढले असून, त्यानुसार परिमंडळ १चे कंत्राट भवानी ट्रेडर्सला प्रति फेरी १,५६९ रुपये या दराने देण्यात येणार आहेत. त्यांना पालिका वर्षभरासाठी ७१ लाख ४८ हजार रुपये देणार आहे. मात्र, परिमंडळ २ चे कंत्राट याच ठेकेदाराला प्रतिट्रीप १,४८५ रुपये या दराने वर्षभरासाठी ५६ लाख ३७ हजार रुपये अदा केले जाणार आहेत, तर परिमंडळ ६चे कंत्राट प्रतिट्रीप १,५०३ रुपये या दराने वर्षभरासाठी ९१ लाख २८ हजार रुपये अदा केले जाणार आहेत.
परिमंडळ ३ चे कंत्राट लक्ष्य इंटरप्राइजला प्रतिट्रीप १,५०० रुपये या दराने, वर्षभरासाठी ७९ लाख ७१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. परिमंडळ ४ चे कंत्राट सनरेश इंटरप्राइजला प्रतिट्रीप १,४४६ रुपये या दराने, वर्षभरासाठी ८७ लाख ८२ हजार रुपये अदा केले जाणार आहेत. परिमंडळ ५चे कंत्राट लिंब्रा इंटरप्राइजला प्रतिट्रीप १,५११ रुपये या दराने वर्षभरासाठी ७४ लाख ५६ हजार रुपये अदा केले जाणार आहेत, तर परिमंडळ ७ चे कंत्राट, स्पॉट अँड साइट कलेक्शनला प्रतिट्रीप १,५४३ रुपये या दराने वर्षभरासाठी ७६ लाख १४ हजार अदा केले जातील.