कुलदीप घायवट मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात जास्त महसूल देणाऱ्या दोन मेल, एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सरकारद्वारे रेल्वेचे खासगीकरण सुरू असल्याचे चित्र आहे. खासगीकरणाचे पुढचे पाऊल यूटीएस अॅपद्वारे टाकण्यात येत आहे. खासगीकरणाची ही वाळवी रेल्वेला पोखरणार असल्याचा आरोप नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने केला आहे.रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्या बंद करून यूटीएस अॅपची घोषणाबाजी केली जात आहे. एटीव्हीएम बसविण्यात आले असले तरी तेथे प्रवाशांच्या रांगा दिसून येतात. स्मार्ट कार्डअभावी एटीव्हीएमवर तिकीट काढून देण्यासाठी कामगाराची नेमणूक केली आहे. रेल्वेकडून तिकीट खिडकी वाढविण्याऐवजी खासगीकरणाच्या सुविधा आणल्या जात आहेत, असा आरोप नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी केला.
प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने केलेल्या योजनांचे स्वागत युनियनच्या वतीने केले जाते. मात्र लोकलमधील गर्दीवर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासन खासगीकरण करीत आहे, असे नायर म्हणाले. रेल्वेसारखी स्वस्त सेवा कुठेही नाही : मुंबईत मेट्रो, मोनोसारखी पर्यायी वाहतूक आहे. यामध्ये वर्साेवा ते घाटकोपर ११.४ किमीच्या मार्गासाठी ४० रुपये आकारण्यात येतात. मात्र रेल्वेमध्ये सीएसएमटी ते कसारा, कर्जत, खोपोली ११४ ते १२० किमीचा प्रवास ३० ते ३५ रुपयांत होतो. त्यामुळे रेल्वेसारखी स्वस्त सेवा नाही. प्रत्येक प्रवासी हा स्मार्ट नाही, हे लक्षात घ्यायला हवे, असे नायर म्हणाले. तर, प्रवाशांना जलद तिकीट मिळण्यासाठी तसेच त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी यूटीएस अॅपचा वापर केला जातो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.