Join us

पर्यटन सुविधा उभारण्यासाठी एमटीडीसीच्या जमिनींचे खासगीकरण; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:44 AM

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास आता खासगीकरणातून करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. याशिवाय समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथील महामंडळाचे रिसॉर्ट तसेच ताडोबा आणि फर्दापूर (औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येईल. या मालमत्ता पोटभाड्याने देण्याचा कालावधी उच्चस्तरीय समिती ठरवेल. तसेच जमिनीसाठी आकारावयाचे अधिमूल्य व वार्षिक भाडेदेखील निश्चित करण्यात येईल. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. या जमिनी किंवा मालमत्ता साठ किंवा नव्वद वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात येतील तसेच त्यांच्या उभारणीत सरकारचीदेखील भागीदारी असेल. खाजगी कंपन्यांना सबसिडी वगळता इतर काही सवलती देण्यात येणार आहेत. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स उभारण्यासंदर्भातील धोरणांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.