Join us  

प्रिया दत्त यांच्या संपत्तीत २४ कोटी, तर देवरांच्या २० कोटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:13 AM

प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सोमवारी उमेजवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : उत्तर मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या संपत्तीत २०१४ च्या तुलनेत २४ कोटींनी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या संपत्तीत २० कोटींनी वाढ झाली आहे. दोघांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सोमवारी उमेजवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दत्त यांच्या संपत्तीत २४ कोटींची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ६३ कोटी ४९ लाख ३६ हजार ५२१ रुपये होती; ती आता ८७ कोटी ६१ लाख ६७ हजार ८४७ रुपये झाली आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता १७ कोटी ८४ लाख १ हजार १८० रुपयांची असून स्थावर मालमत्ता ६९ कोटी ७७ लाख ६६ हजार ६६७ रुपये आहे.प्रिया दत्त यांचे पती ओवेन रॉनकॉन यांची जंगम मालमत्ता ५ कोटी ८५ लाख ५३ हजार १३५ रुपये तर स्थावर संपत्ती २ कोटी २५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण मालमत्ता ८ कोटी १० लाख ५३ हजार १३५ रुपये आहे. प्रिया दत्त व त्यांच्या पतीची एकूण संपत्ती ९५ कोटी ७२ लाख २० हजार ९८२ रुपये आहे.

दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या मालमत्तेत सुमारे २० कोटींची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेत २२ कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. देवरा यांनी २०१४ मध्ये त्यांच्या नावावरील २७ कोटी ६६ लाख रुपये मालमत्ता जाहीर केली होती.मात्र २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना त्यांच्या नावावर ४७ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये त्यांच्या आईकडून मिळालेल्या १३ कोटी ५९ लाख रुपये किमतीच्या घराचा समावेशआहे.

देवरा यांची पुनीत देवरा ट्रस्टमध्ये २० टक्के भागीदारी आहे. तसेच काही कंपन्यांचे शेअर्सही त्यांच्या नावे आहेत. त्यांच्या पत्नी पूजा देवरा यादेखील व्यावसायिक असून त्यांची मालमत्ता तब्बल ३१ कोटी रुपये आहे. २०१४ मध्ये पूजा यांच्या नावावर सुमारे १० कोटी रुपये होते. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या पत्नीच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांमध्ये २१ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.