पनवेल : पद्मानंद सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय व सेक्टर - १५ रहिवासी संघ यांच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या मिस व मिसेस खारघर स्पर्धेत प्रियंका अहिरे या मिस खारघर व विद्या बागडे या मिसेस खारघरच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेचे आयोजन सुनील सावर्डेकर यांनी केले होते, तर माध्यम प्रायोजक लोकमत होते. दोन्ही स्पर्धेसाठी एकूण ३० महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी मिस खारघरचा मान प्रियंका अहिरे यांनी मिळविला, तर नीतिप्रिया सिंग या उपविजेत्या ठरल्या. मिसेस खारघर स्पर्धेत विद्या बागडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शाहीन देसाई या उपविजेत्या ठरल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत अनिता आर्यमाने या ८५ वर्षांच्या महिलेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसेस खारघर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भाग्यश्री आर्यमाने, डॉ. मनीषा माटकर, लिपी चौधरी, सौरभ कुमार, मलिका अमीन यांनी काम पाहिले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, अरविंद सावळेकर, के. सी. पाटील, रामदास नारकर, सुदाम पाटील, अनंता पाटील आदी उपस्थित होते. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या बुद्धिमत्तेचाही कस लागला. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी फेरी उत्तरोत्तर रंगू लागली. (प्रतिनिधी)
प्रियंका अहिरे ‘मिस खारघर’
By admin | Published: April 04, 2015 10:40 PM