कैदेतील प्रियकराच्या भेटीसाठी प्रियंका बनली ‘सना’!; महिलेसह ९ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 08:57 AM2023-08-18T08:57:45+5:302023-08-18T08:58:14+5:30
आंतरराज्यीय ड्रग्ज खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश करत, ७१ लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आंतरराज्यीय ड्रग्ज खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश करत, ७१ लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. एका महिलेसह नऊ आरोपींना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. यातील ड्रग्ज माफिया सर्फराज शाबीर अली खान उर्फ गोल्डन भुरा हा आर्थर रोड कारागृहात असताना त्याच्या भेटीसाठी प्रियंका अशोक कारकोर ही सना शाबीर अली खानच्या नावाने बनावट आधार कार्डचा वापर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
नागपूरहून काही जण मुंबईत ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष सहाला मिळाली. त्यानुसार, पथकाने मुलुंड टोलनाका परिसरात तीन कार अडवून झाडाझडती घेताच, आरोपींकडे एमडी, चरसचा साठा मिळून आला. चेंबूर आणि कुर्ला येथील घरातही झाडाझडती करण्यात आली. कारवाईत एकूण सव्वा कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
डान्सबारमध्ये भुरा तिच्या प्रेमात
या प्रकरणातील आरोपी सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकोर (२४) हिच्याकडे दोन आधार कार्ड मिळाली. भुरा कारागृहात असताना त्याच्या भेटीसाठी सना नावाने आधार कार्ड बनवून ती जात होती. प्रियंका डान्स बारमध्ये काम करायची. डान्स बारमध्येच भुरा तिच्या प्रेमात पडला. २०१८ पासून ते सोबत आहेत. प्रियंकाही त्याच्या ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय झाली. ड्रग्ज विक्रीतून येणारी रक्कम प्रियंकाच्या चेंबूरच्या घरात ठेवण्यात येत होती. १७ लाखांची रोकड तिच्या घरातून जप्त केली.