Join us

तिकिटाची आशा होती, पण काँग्रेस सोडण्याचं कारण गैरवर्तन; प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 2:09 PM

प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून शिवसेनेचे 'शिवबंधन' हाती बांधले. 

मुंबई : काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून शिवसेनेचे 'शिवबंधन' हाती बांधले आहे.

मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. तसेच, 10 वर्षे नि:स्वार्थपणे काँग्रसेमध्ये सेवा केली. मात्र, काँग्रेसमध्ये मला गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागला. आता यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे. याशिवाय, काँग्रेसकडून मला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते भेटले नाही म्हणून मी पक्ष सोडलेला नाही, असा खुलासाही यावेळी प्रियंका चतुर्वेदींनी केला. 

काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती. 

'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळतंय'

काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जातं असल्याचं चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे,' अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातलं एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं होतं. 

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेस