मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला असून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आज दुपारी 1.30 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने या बैठकीतच घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती.
चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरील त्यांचा स्टेटसही बदलला असून काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा उल्लेख काढला आहे.