अनेक बॉलिवूड स्टार्सना वेळोवेळी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना किंवा त्यासाठी जनजागृती करताना आपण पाहतो. थोड्याच दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडला. त्यावेळी या जोडप्याने आपल्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये गिफ्ट स्वीकारण्याऐवजी त्यांनी स्थापना केलेल्या 'लिव्ह लव लाफ फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेला मदत करण्याची विनंती केली होती. ही एनजीओ मानसिक आजारांबाबत लोकांना सतर्क करण्याचे काम करते. दीपवीर पोठोपाठ बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही आता असाच एक सोशल उपक्रम हाती घेतला आहे. प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र येऊन 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या इव्हेंटमार्फत अनेक सामाजिक मुद्द्यांबाबत जागरूकता पसरवण्याचा उपक्रम राबवणार आहेत.
'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) हा एक फेसबुकवरून प्रसारित होणारा लाइव्ह इव्हेंट असून तो 27 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. चार तास चालणाऱ्य़ा या इव्हेंटमध्ये मानसिक आरोग्य, सायबर बुलिंग आणि महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांवर जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना प्रियांकाने सांगितले की, 'सोशल मीडिया हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. याचा वापर चांगल्या कामासाठी करून घेणं गरजेचं आहे. मी सुद्धा याबाबत माझं मत व्यक्त केलं आहे आणि त्याबाबत जनजागृतीही केली आहे. अनेकदा मी चांगल्या कामांसाठी झालेला सोशल मीडियाचा सकारात्मक परिणाम वैयक्तिकरित्या अनुभवला आहे.'
प्रियांकाने 'सोशल फॉर गुड' या इव्हेंटबाबत बोलताना सांगितले की, 'मी फेसबुकसोबतच्या या पार्टनरशिपबाबत फार खुश आहे. मला असा विश्वास आहे की, या इव्हेंटमार्फत जागरूकता पसरवण्यास मदत होईल.' दरम्यान प्रियांका व्यतिरिक्त इतरही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इव्हेंटसाठी एकत्र येणार आहेत. प्रियांका आणि फेसबुक इंडियाला असा विश्वास आहे की, या इव्हेंटला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि लोक या मुद्द्यांबाबत जागरूक होतील.