Join us

मोठी बातमी! प्रियांका गांधी मुंबईत, विमानतळावरच केली राज्यातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:02 AM

शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील फुटीच्या घटनांचा इतर पक्षांनीही आता धसका घेतला आहे.

मुंबई-

शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील फुटीच्या घटनांचा इतर पक्षांनीही आता धसका घेतला आहे. त्यात काँग्रेस पक्ष सर्वाधिक सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांची राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तातडीची नेमणूक हायकमांडकडून करण्यात आली होती. बुधवारी कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदार आणि महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक देखील घेतली. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज सकाळी मुंबई विमानतळावरच राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

VIDEO: एकनाथ शिंदेंच्या हॉटेल रुममधला 'तो' संवाद व्हायरल, 'त्या' आमदाराला काढणार!

प्रियांका गांधी आज त्यांच्या एका खासगी कामासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी विमानतळावरच प्रियांका गांधी यांनी राज्यातील महत्वाच्या काँग्रेस नेत्यांना बोलावून घेतलं होतं. प्रियांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. राज्यातील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर त्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाल्या आहेत. 

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण

शिंदे गटाकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री वर्षा निवासस्थान सोडलं आणि ते मातोश्रीवर दाखल झाले. वर्षा निवासस्थान सोडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती समोर आली होती. त्यात आता काँग्रेस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. काँग्रेसचे सर्व आमदार संपर्कात असून महाविकास आघाडी सरकारच्या पाठिशी ठामपणे काँग्रेस पक्ष उभा असल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. कमलनाथ यांचंही काल मुख्यमंत्री ठाकरेंशी फोनवरुन बोलणं झालं आणि त्यांनीही काँग्रेस पक्ष सोबत असल्याचं ठाकरे यांना सांगितलं आहे. 

टॅग्स :प्रियंका गांधीएकनाथ शिंदेशिवसेना