Join us  

मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करणाऱ्यास मिळणार बक्षीस

By admin | Published: April 18, 2016 12:59 AM

देवनार येथे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यास चार महिने उलटूनही पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या महिलेची माहिती देणाऱ्याला

मुंबई : देवनार येथे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यास चार महिने उलटूनही पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या महिलेची माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या इंडियन आॅइल कॉलनीत महावीर प्लॅटिनम इमारतीच्या रेन्बो कम्पाउंडमधील नाल्यामध्ये १७ डिसेंबर रोजी दोन सुटकेसमध्ये तुकडे केलेला महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले होते. महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे रेखाचित्रही तयार करण्यात आले. दरम्यान, कुठल्याही स्वरूपाची माहिती हाती लागली नाही. आतापर्यंत तब्बल ८०० जणांकडे चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे या तपासादरम्यान पोलिसांंनी जवळपास आठ मृत महिलांच्या गुन्ह्यांचा उलगडा केला. मात्र या गुन्ह्याचा उलगडा करण्यास अद्याप त्यांना यश आलेले नाही. हत्येत महिलेचे नातेवाईक सहभागी असावेत या संशयातून तब्बल १० पेक्षा अधिक जणांची डीएनए चाचणी करण्यात आली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या भागातील टॅक्सी, रिक्षाचालकांकडेही कसून चौकशी करण्यात आली. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम कार्यरत आहेत. अखेर माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)