मुंबई : मंगळवारी रात्री मध्य मुंबई, पूर्व उपनगरातील काही भागासह नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली असतानाच येत्या ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात सायंकाळसह रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर येत्या ७२ तासांसाठी विदर्भात उष्णतेची लाट राहील, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. भायखळा, चिंचपोकळी, लालबाग, घाटकोपर, मानखुर्द आणि गोरेगाव येथील काही ठिकाणी सरींचा शिडकावा झाल्याचे चित्र होते. तर विक्रोळी आणि भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसाचा रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी रस्ते वाहतूक खोळंबल्याने मुलुंड टोलनाका ते भांडुप पम्पिंगपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीही काही क्षणांसाठी मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता.
मुंबईत पावसाची शक्यता
By admin | Published: May 26, 2016 1:06 AM