Join us

संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:05 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आरोग्य विभागाची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय ...

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या पुन्हा दुपटीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या ही ८ लाख होऊ शकते, तसेच १० टक्क्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील सादरीकरणात सांगितले.

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. शंशाक जोशी म्हणाले, यूके (ब्रिटन) तिसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. फक्त एका आठवड्यातच दुसऱ्या लाटेइतका प्रादुर्भाव या लाटेचा झाला आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्यालाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. संसर्गजन्य रोगांवरील शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण १०० दिवस ते आठ आठवड्यांत या लाटेचे पीक येऊ शकते. आम्हाला विश्वास आहे की, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका नसेल. मागील दोन लाटांदरम्यान ज्याप्रमाणे रुग्णांची टक्केवारी होती, त्याचप्रमाणे या वेळी ही टक्केवारी ३.५ पेक्षा अधिक नसेल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आधीपासूनच तयारी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे की नाही ते पाहावे, अशी सूचना दिली आहे. सोबतच टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही बैठक पार पडली आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टरांना सिरो सर्व्हे करण्यासह मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

........................................................