मुंबई : मुंबईकरांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले तर डम्पिंग ग्राउंडसह कचऱ्याची समस्या काही अंशी तरी सुटेल, असा सूर विविध मान्यवरांनी ‘कचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी’ विषयावर खुल्या चर्चासत्रात लगावला.मुंबईत निर्माण झालेली कचऱ्याची परिस्थिती लक्षात घेता कचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी नागरिकांनी कशा प्रकारे करावी; याबाबत रविवारी चेंबूर (पूर्व)च्या घाटकोपर-मानखुर्द लिंक मार्गावरील आरबीके इंटरनॅशनल अॅकॅडमीमध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांच्या वतीने खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, आमदार अस्लम शेख, उपआयुक्त विजय बालमवार, पर्यावरण तज्ज्ञ ऋषी अगरवाल, स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर, पर्यावरण कार्यकर्ते एस. बालाकृष्णन, व्ही सिटीझन अॅक्शन नेटवर्कच्या व्यवस्थापकीय विश्वस्त इंद्राणी मल्कानी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.निरुपम म्हणाले, देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर नागरिकांना श्वसनक्रियेत आलेल्या अडचणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता या क्षेत्रात ठोस काम करण्याची आवश्यकता आहे. विविध देशांमधील तंत्रज्ञान लक्षात घेता ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ऋषी अग्रवाल म्हणाले, नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिल्यास कचऱ्याची समस्या दोन ते तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी नागरिकांच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. वर्गीकरण करून कचरा न दिल्यास महापालिकेने कायद्यान्वये प्रत्येक दिवशी १ हजार रुपये दंड नागरिकांवर आकारण्याचे काम नियमितपणे आठ ते दहा दिवस करावे, जेणेकरून नागरिक दंड पडू नये म्हणून नियमितपणे कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा महापालिकेला देतील. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांत कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.ज्योती म्हापसेकर म्हणाल्या, कचरावेचक महिलांची रोजीरोटी या डम्पिंगमधील कचरा वेचण्याच्या कामावर अवलंबून असून, त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची गरज आहे. उपाहारगृह चालकांनीसुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून महापालिकेला दिल्यास मोठ्या अंशी महापालिकेचे काम हलके होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.इंद्राणी मल्कानी म्हणाल्या, कचरा वर्गीकरण करण्याच्या कामात कुठलाही वेळ न घालविता या क्षणापासूनच सुरुवात करायला हवी.
कचऱ्याच्या वर्गीकरणाने समस्या सुटेल
By admin | Published: April 04, 2016 2:21 AM