हिरानंदानी रुग्णालय अडचणीत
By admin | Published: January 5, 2017 04:14 AM2017-01-05T04:14:34+5:302017-01-05T04:14:34+5:30
वाशी येथील हिरानंदानी हेल्थकेअर प्रा.लि.चे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे असलेल्या भूखंडालगतच्या सिडकोच्या भूखंडावर, आॅक्सिजन गॅस प्लँटशिवाय उपलब्ध
मुंबई : वाशी येथील हिरानंदानी हेल्थकेअर प्रा.लि.चे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे असलेल्या भूखंडालगतच्या सिडकोच्या भूखंडावर, आॅक्सिजन गॅस प्लँटशिवाय उपलब्ध असलेल्या अन्य सर्व सुविधा बंद करण्याची हमी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने हिरानंदानी हेल्थ केअर प्रा. ला दिले आहेत. अन्यथा कोणताही अंतरिम दिलासा देणार नाही, असेही उच्च न्यायालयाने हिरानंदानी हेल्थ केअरला बजावले आहे.
हिरानंदानी हेल्थ केअर प्रा. लि. चे वाशी येथे बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा भूखंड परत घेण्याचे आदेश राज्य सरकारने काहीच महिन्यांपूर्वी सिडकोला दिले. हिरानंदानीने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये सिडकोला हिरानंदानीविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला होता. मात्र, हिरानंदानीने रुग्णालयाच्या इमारतीच्या शेजारील भूखंडही परवानगी न घेताच, हडप केल्याने सिडकोने या भूखंडाला कुंपण घालून हद्द आखली. या भूखंडावर पार्किंगची सुविधा, आॅक्सिजन गॅस प्लँट, डिझेल जनरेटर, कचऱ्याचे विघनट करण्यात येत असल्याने, हिरानंदानी हेल्थ केअरने हे कुंपण हटवण्यात यावे व या भूखंडावर उपलब्ध असलेल्या सुविधा बंद करण्यात येऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, रुग्णालयालगत असलेल्या भूखंडावर असलेल्या सुविधांशिवाय रुग्णालय चालवणे अशक्य आहे. मात्र, सिडको याच सुविधा बंद करत आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक सुविधा मिळू शकत नाही आणि रुग्णालयाचा कारभारही ठप्प होईल. हा भूखंड कायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेनेच संबंधित भूखंड वापरण्याची परवानगी दिली आहे.
त्यावर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने संबंधित भूखंड सिडकोने नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित केला
आहे का? अशी विचारणा याचिकाकर्त्यांकडे केली. त्यावर सिडकोच्या वकिलांनी अद्याप हा
भूखंड नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला नसून, रुग्णालयाने त्याचा बेकायदेशीर
ताबा घेतल्याचे खंडपीठाला
सांगितले. (प्रतिनिधी)