Join us  

प्रदूषणाचा प्रश्न जटील? धूलिकणांनी मुंबई शहर, उपनगराला वेढले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 10:03 AM

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचा प्रश्न जटील होत असून, दिवाळीत वायुप्रदूषणाने कहर केला होता.

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचा प्रश्न जटील होत असून, दिवाळीत वायुप्रदूषणाने कहर केला होता. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे प्रदूषण कमी झाले असले तरी आता कमी अधिक प्रमाणात दृश्यमानता कमी होत आहे. गुरुवारी मुंबईतल्या ठिकठिकाणची हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली असतानाच दुसरीकडे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी मुंबईच्या हवेत धूलिकणांचे प्रमाण अधिक असून, वाईट हवा आरोग्याला धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेने मुंबईतल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

नियम माेडणाऱ्यांना दंड :

जे बांधकाम प्रकल्प पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत आहेत; अशांना दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ग्रीन नेट लावण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय मध्यंतरी तर टँकर्सने रस्ते धुण्यात आले आहेत. हजारो लीटर पाणी रस्त्यांवर ओतण्यात आले आहे. मात्र असे उपाय म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे रावी राजा यांचे म्हणणे आहे.

दर्जा वाईट :

मलबार हिल परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १८७ असून, तो वाईट कॅटेगरीत येत आहे. मुंबईतल्या इतर भागांतही निर्देशांक १२०-१३० आहे. ज्या भागात राज्याचे मंत्रालय आहे. इतर प्रशासकीय कार्यालये आहेत; तिथल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाईट आहे.

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १५० असला किंवा त्या जवळपास असला तरी हवेतील धूलिकण मुंबईकरांच्या आरोग्याला घातकच आहेत. याकडे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता कामा नये. धूलिकणांमुळे त्रास होतो याकडे लक्ष दिले पाहिजे. यावर उपाय म्हणून रस्ते धुऊन काही होणार नाही. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरेकिटिंग केले पाहिजे. धूळ उडली नाही पाहिजे, असे उपाय केले पाहिजेत - रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबईप्रदूषण