सहार गावात समस्याच समस्या

By admin | Published: June 21, 2016 02:47 AM2016-06-21T02:47:12+5:302016-06-21T02:47:12+5:30

अंधेरी (पूर्व) सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर झकास तर येथील पुरातन सहार गावठाण मात्र भकास असे चित्र आहे

Problem problem in Sahar village | सहार गावात समस्याच समस्या

सहार गावात समस्याच समस्या

Next

मनोहर कुंभेजकर / गौरी टेंबकर, मुंबई
अंधेरी (पूर्व) सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर झकास तर येथील पुरातन सहार गावठाण मात्र भकास असे चित्र आहे. येथे ड्रेनेज सिस्टीमच अस्तित्वात नाही. गटारे, नाले साफ नाहीत. स्वछतेचा बोजवारा उडाला आहे. रस्ते खराब असून पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. एकंदर सहार गावात समस्यांचा डोंगरच असून, लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे साफ कानाडोळा केला आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. निमित्त होते ते ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे.
सहार गावातील अवर लेडी आॅफ हेल्थ चर्चच्या परिसरात सहार सिटीझन्स फोरम, सहार व्हिलेजर्स, वॉचडॉग फाउंडेशन, सेव्ह अवर लॅन्ड, द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन, गार्डियन्स युनायटेड, सिव्हिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल सेल-चिवीम चर्च या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सहार गाव येथे ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तब्बल पाचशेहून अधिक स्थानिकांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी महापालिकेच्या के (पूर्व)चे दुरुस्तीचे विभागाचे साहाय्यक अभियंता रणजित पाटील, दुय्यम अभियंता अभिजित मोटे आणि घनकचरा विभागाचे अमोल चिमटे उपस्थित होते. सहार सिटीझन्स फोरमचे डोनाल्ड डिलिमा, सेव्ह अवर लॅण्डच्या डॉल्फी डिसोझा, गर्ग पेरेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉचडॉग फाउंडेशनचे ग्रॉडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा, द बॉम्बे
इस्ट इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्हिवियन डिसोझा उपस्थित होते.

सहारमध्ये ड्रेनेज सिस्टीमच नाही. सुतार पखाडी गावठाणाचा समावेश नव्या विकास आराखड्यात नाही. प्रभाग क्रमांक ७५ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे सहार गाव पावसाळ्यात पाण्याखाली जाईल. रस्त्यांची चाळण झाली आहे. शिवाय गावठाणांना विकासकामांसाठी निधी मिळत नाही. येथील चर्चच्या आवारातील अवर लेडी आॅफ हेल्थ स्कूलच्या समोरील रस्ता जीव्हीके कंपनीने पत्रे टाकून बंद केला आहे. त्यामुळे शाळेतील सहा हजार विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता जीव्हीकेने त्वरित सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल. शिवाय सहार गावठाणातील रहिवाशांच्या घरांसाठी सर्व्हेच्या नोटीस आल्या आहेत. आमचा पुनर्विकासाला विरोध नाही. पण पुनर्विकासाचा आराखडा देण्यात यावा, असे आमचे म्हणणे आहे. विमानतळांच्या परिसरातील सुमारे १ लाख झोपड्यांचा नव्या विकास आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. येथील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. त्रिमूर्ती चाळीतील नागरिक गेल्या ४०-५० वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांच्या घरांना जीव्हीकेने कुंपण घातले आहे. शिवाय २४ तास सुरक्षा ठेवण्यात आली आहे. हे कुंपण काढण्यासह सुरक्षा काढण्यात यावी.- निकोलस अल्मेडा

प्रस्तावित कोस्टल रोडमुळे समुद्रात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मार्वे आणि गोराई या सागरी किनारा क्षेत्रावर होणार आहे. वांद्रे सी-लिंकमुळे यापूर्वीच समुद्रात भराव घालण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात धोका अधिकच वाढणार आहे. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईतील एकमेव हरित पट्टा म्हणून ओळखला जाणारा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आरे परिसर नष्ट होणार आहे. परिणामी पर्यावरणाची हानी होणार आहे.- ग्रॉडफे पिमेंटा

Web Title: Problem problem in Sahar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.