लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजेच लसीकरण, नसबंदी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत असली तरी महापालिकेला यात म्हणावे तसे यश आलले नाही. कारण भटक्या श्वानांचा उपद्रव वाढतच असून, भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे नागरिकांना इजादेखील होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र नियोजनाचा अभाव, अपुरे मनुष्यबळ आणि इतर अनेक कारणांमुळे भटक्या श्वानांनी चावा घेण्याची समस्या कायमच आहे.
मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग भटक्या श्वानांचे लसीकरण, नसबंदीसाठी काम करत असले तरी, आरोग्य विभागाला यात म्हणावे तसे यश आलेले नाही. कारण झोपड्या, चाळी आणि इमारतीच्या परिसरातील भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण काही कमी होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रस्तावरील भाजी मार्केट, मंडई, कचराकुंडी, ठिकठिकाणचे नाके, उद्याने, डम्पिंग ग्राउंड, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांचा उपद्रव आहे. भटके श्वान कधी स्वत:चा बचाव करण्यासाठी, तर कधी अन्य कारणांमुळे नागरिकांचा चावा घेतात. अनेक ठिकाणी भटक्या श्वानांचे घोळके हल्ले करतात. अशा घटनांना आवर घालण्यासाठी केवळ महापालिका नाही तर लोकप्रतिनिधींनीही काम केले पाहिजे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी गेल्या कित्येक वर्षांपासून उग्र स्वरूप धारण करत असल्याचा नागरिकांचा आराेप आहे.
-----------
नियोजन, समन्वयाचा अभाव
भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि त्यांचा चावा, ही समस्या कुठल्याही एका परिसरापुरती मर्यादित नाही. संपूर्ण मुंबईत ही समस्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही समस्या दिसून येते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभगाने यासाठी नियोजन करून काम केले पाहिजे. मात्र नेमका याचा अभाव आहे. पुरेसे मनुष्यबळ नाही. नसबंदीबाबत काम केले तर भटक्या श्वानांचा उपद्रव कमी होईल. मात्र नियोजन, समन्वयाच्या अभावामुळे समस्या वाढत आहे.
- राकेश पाटील, मुंबईकर
-----------
एका श्वानामागे ६८० रुपये खर्च
भटक्या श्वानांना पकडून निर्बीजीकरण, रेबीज लसीकरण केले जाते. वर्षाला ३२ हजार श्वानांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असतो. एका श्वानामागे ६८० रुपये खर्च केले जातात. भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी मनुष्यबळासह सात परिमंडळात सात वाहने उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
-----------
श्वानांचे लसीकरण
मुंबई महापालिका वर्षाला ३० टक्के भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी उपाय करत असून, या कार्यक्रमामुळे समस्येवर नियंत्रण मिळविण्यात यश येईल. श्वानाने चावा घेणे या समस्येवरही नियंत्रण मिळविता येईल, असा दावा केला जात आहे.
-----------
पुन्हा साेडले जाते त्याच परिसरात
मुंबई महापालिका भटक्या श्वानांना पकडते. लसीकरण करते. पुन्हा त्यांना त्यांच्या परिसरात सोडते २०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली. तेव्हा ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी २५ हजार ९३५ भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले नव्हते.
-----------